हरारे - बांगलादेशने झिम्बाब्वेचा एकमात्र कसोटी सामन्यात २२० धावांनी पराभव केला. झिम्बाब्वचे दुसरा डाव २५६ धावांवर आटोपला. बांगलादेशचे गोलंदाज मेहदी हसन मिराज आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
बांगलादेशने झिम्बाब्वे समोर विजयासाठी ४७७ धावांचे अवजड लक्ष्य ठेवले होते. कर्णधार ब्रेंडन टेलरने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर डोनाल्ड तिरिपानो याने ५२ धावांचे योगदान दिले. आज सकाळी झिम्बाब्वेने ३ बाद १४० वरून खेळण्यास सुरूवात केली. परंतु त्यांची मधली फळी लवकर बाद झाल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली.
झिम्बाब्वेच्या तळातील फलंदाजांना कडवा प्रतिकार केला. परंतु ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. दहाव्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या ब्लेसिंग मुजारबानी ३० धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशच्या मेहदी हसन याने ६६ धावांत ४ तर तस्किन अहमद याने ८२ धावांत ४ गडी बाद केले.