लंडन :इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा आज तिसरा दिवस आहे. लंच पर्यंत भारताने 6 गड्यांच्या मोबदल्यात 260 धावा केल्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे 122 चेंडूत 89 धावा आणि शार्दूल ठाकूर 83 चेंडूत 36 धावा क्रिजवर आहेत. या दोघांमध्ये 133 चेंडूत 108 धावांची भागिदारी झाली आहे.
भारताची सुरुवात खराब झाली : तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारताच्या नावे राहिले. भारताने या सत्रात एक विकेट गमावून 109 धावा केल्या. भारताची आजची सुरुवात फार खराब झाली. दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर के. एस भरत बाद झाला. त्याला बोलॅंडने बोल्ड केले. त्याने 15 चेंडूत 5 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरने अजिंक्य रहाणेच्या मदतीने भारताचा डाव सांभाळला.
अजिंक्य रहाणेचे अर्धशतक : अजिंक्य रहाणेने आज कसोटी कारकिर्दीतील 26 वे अर्धशतक साजरे केले. त्याने षटकार मारून 50 धावा पूर्ण केल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अर्धशतक झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यासह अजिंक्य रहाणेने आज कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या. अर्धशतकानंतर रहाणेने धावांचा वेग वाढवला. शार्दूल ठाकूरनेही त्याला उत्तम साथ दिली. असे असले तरी ऑस्ट्रेलिया अजूनही या सामन्यात खूप पुढे आहे. सध्या भारत 209 धावांनी पिछाडीवर आहे. फॉलोऑन टाळण्यासाठी भारताला आणखी 10 धावांची आवश्यकता आहे. भारताची संपूर्ण मदार आता या जोडीवर आहे.
भारताचा टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 विकेट गमावत 151 केल्या होत्या. भारताचा टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी ठरला. भारताच्या टॉप चार फलंदाजांपैकी एकालाही 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार रोहित शर्मा 15 धावा करून बाद झाला तर शुभमन गिलही केवळ 13 धावा करू शकला. कोहली आणि पुजाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र हे दोघेही अपयशी ठरले. या दोघांनीही 14 धावा केल्या.
हेही वाचा :
- WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी भारताची पडझड, सुरुवातीलाच ३ गडी तंबूत