नवी दिल्ली :महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजयाने सुरुवात केली आहे. शनिवारी, 11 फेब्रुवारी रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे रात्री 10.30 वाजता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील तिसरा सामना खेळला गेला. या सामन्यात 5 वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाने किवी संघाचा बँड वाजवला आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडचा 97 धावांनी पराभव केला. महिला टी-20 च्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात ऍशले गार्डनरने चांगली गोलंदाजी करताना 5 बळी घेतले. यासाठी ऍशले गार्डनरला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे.
70 धावांची भागीदारी :या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 173 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 174 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचवेळी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा संघ 14 षटकांत 76 धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात ऍशले गार्डनरने उत्कृष्ट फॉर्ममध्ये गोलंदाजी करत 3 षटकात केवळ 12 धावा देत 5 बळी घेतले. ॲशले गार्डनरने या सामन्यातील उत्तम कामगिरीसाठी सामनावीराचा ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची सुरुवात काही खास नव्हती. बेथ मुनी पहिल्याच षटकात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर अॅलिसा जीन हिली आणि कर्णधार मेग लॅनिंग यांनी 70 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलिया संघाला मजबूत स्थितीत आणले.