पुणे:महिला टी-20 चॅलेंजच्या ( Womens T20 Challenge 2022 ) यंदाच्या हंगामातील दुसरा सामना व्हेलॉसिटी विरुद्ध सुपरनोव्हाज ( Velocity vs Supernovas ) यांच्यात खेळला गेला. मंगळवारी पुण्यातील एमसीएक क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात व्हेलॉसिटी संघाने सुपरनोव्हाजचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे सुपरनोव्हाज संघाला यंदाच्या हंगामात पहिल्यादाच पराभव पत्कारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाज संघाने 20 षटकांत 5 बाद 150 धावा केल्या होत्या. त्यामुळे व्हेलॉसिटी संघाला 151 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य व्हेलॉसिटी संघाने 18.2 षटकांत 3 फलंदाज गमावून 151 धावा करत पूर्ण केले आणि यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.
शफाली वर्माच्या आक्रमक अर्धशतकाच्या ( Shafali Verma half century ) जोरावर महिला टी-20 चॅलेंजमध्ये विजयासह व्हेलॉसिटी संघाची सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हा संघाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात 150 धावांची मोठी मजल मारली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 71 धावांची शानदार खेळी केली. एक दिवस आधी सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सचा 49 धावांनी पराभव केला होता. हा सामना रात्री 11 वाजता संपला. त्याचवेळी दुसरा सामना आज दुपारी 3.30 वाजता सुरू झाला. म्हणजेच सुपरनोव्हासला दुसरा सामना 16 तासांच्या अंतराने खेळावा लागला. याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवरही झाला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना व्हेलॉसिटीची सुरुवात चांगली झाली नाही. नथकन चँथम केवळ एक धाव काढून वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरची ( Bowler Pooja Vastrakar ) बळी ठरली. दरम्यान शेफालीने दमदार फलंदाजी सुरुच ठेवली. तिने यास्तिका भाटियासह दुसऱ्या विकेटसाठी 63 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. भाटियाने 13 चेंडूत 17 धावा केल्या आणि डॉटिनने तिला बाद केले. दरम्यान, शेफालीने 33 चेंडूत 51 धावा करून डॉटिनची दुसरी बळी ठरली. तिने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. म्हणजेच 42 धावा फक्त चौकारावरून मारुन केल्या.