ग्रेनेडा -वेस्ट इंडिज संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाचे उट्टे पहिल्या टी-२० सामन्यात काढले. वेस्ट इंडिजने आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना ८ गडी आणि ३० चेंडू राखून जिंकला. विंडीजच्या या विजयात एविन लुईस याने ७१ धावांची ताबडतोड खेळी केली.
ग्रेनेडाच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा आफ्रिकीने निर्धारित २० षटकात ६ बाद १६० धावा केल्या. यात रासी वान डर डुसेन याने नाबाद ५६ धावांचे योगदान दिले. डुसेन व्यतिरिक्त आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडीजकडून ड्वेन ब्राव्हो आणि फॅबियन एलेन यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर जेसन होल्डर आणि आंद्रे रसेल यांना १-१ गडी बाद करता आला.
आफ्रिकेने विजयासाठी दिलेले १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एविन लुईस आणि आंद्रे फ्लेचर या जोडीने ७ षटकात ८५ धावांची सलामी दिली. फ्लेचर धावबाद झाल्यानंतर ख्रिस गेल आणि लुईस या जोडीने संघाला विजयासमीप नेले. शम्सीने लुईसला मिलरकडे झेल देण्यास भाग पाडलं. लुईसने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह ७१ धावांची खेळ केली. लुईस बाद झाल्यानंतर गेल (३२) आणि आंद्रे रसेल (२३) या जोडीने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, उभय संघात पाच सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना जिंकत विंडीजने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.