पोर्ट ऑफ स्पेन Darren Bravo :वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज डॅरेन ब्राव्होनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी दुर्लक्ष झाल्यानंतर त्यानं हा निर्णय घेतला आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली : ब्राव्होने इंस्टाग्रामवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, "क्रिकेटर म्हणून पुढे जाण्यासाठी पुढील पाऊल काय असेल, यावर विचार करण्यासाठी मी बराच वेळ घेतला. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर हे सोपं नाही". इंस्टाग्रामवर लिहिताना त्यानं स्पष्टपणे सांगितलं की, "युवा खेळाडूंना संघात स्थान मिळावं आणि त्यांना संधी मिळावी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे". डॅरेन ब्राव्होनं असंही लिहिलं की, त्याला कोणत्याही संवादाशिवाय अंधारात ठेवण्यात आलं.
टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य : डॅरेन ब्राव्हो २०१२ चा टी २० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा सदस्य होता. याशिवाय त्यानं सुपर ५० कपच्या शेवटच्या हंगामात त्रिनिदाद आणि टोबॅगोचं नेतृत्व करताना सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ब्राव्होनं स्पर्धेत ८३.२० च्या सरासरीनं आणि ९२.०३ च्या स्ट्राइक रेटनं ४१६ धावा केल्या. मात्र त्याची ही कामगिरी त्याला वेस्ट इंडिज संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी ठरली नाही. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी त्याला वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळालं नाही.