मुंबई: सोमवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौथा सामना आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Gujarat Titans vs Lucknow Super Giants ) संघात झाला. या सामन्यात गुजरातने लखनौवर पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, फलंदाजीच्या माध्यमातून मला अधिक जबाबदारी उचलायची आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळणाऱ्या हार्दिकने या सामन्यात 28 चेंडूत 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये त्याला विकेट न घेता आपला चार षटकांचा कोटा पूर्ण करावा लागला.
तत्पूर्वी, लखनौने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या, पण गुजरातने हे लक्ष्य दोन चेंडू राखून पूर्ण केले. सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत विचारले असता हार्दिक पंड्या म्हणाला, ''फलंदाज म्हणून मला अधिक जबाबदारी घ्यायची आहे. आमच्या या विजयात संघातील प्रत्येक सदस्याने आपली भूमिका बजावली.''