नवी दिल्ली Top 5 test batter :वर्ष २०२३ संपायला आता केवळ एक दिवस बाकी आहे. या वर्षात क्रिकेटमध्ये बरंच काही घडलं. आयपीएलच्या धमाकेदार आयोजनासह भारतात एकदिवसीय विश्वचषकाची धूम दिसली. या वर्षात चाहत्यांवर मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा मारा झाला असला तरी, सर्वात जुन्या कसोटी क्रिकेटचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही. कसोटी क्रिकेटमध्येच खेळाडूंच्या कामगिरीचं आणि त्यांच्या प्रतिभेचं खरं मूल्यमापन होऊ शकतं. चला तर मग आज जाणून घेऊया २०२३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ खेळाडू कोणते.
- उस्मान ख्वाजा : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर उस्मान ख्वाजानं यावर्षी १३ कसोटी सामने खेळले. या १३ कसोटी सामन्यांच्या २४ डावात त्यानं सर्वाधिक १२१० धावा केल्या. या कालावधीत त्यानं ३ शतकं आणि ६ अर्धशतकं ठोकली. ख्वाजाची या वर्षातील सर्वोच्च धावसंख्या नाबाद १९५ आहे.
- स्टीव्ह स्मिथ : ऑस्ट्रेलियाचा उजव्या हाताचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं यावर्षी १३ कसोटी सामन्यांच्या २४ डावांमध्ये फलंदाजी केली. या कालावधीत त्यानं ४२.२२ च्या सरासरीनं ९२९ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतकं आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या १२१ आहे.
- ट्रॅव्हिस हेड : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेड २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्यानं १२ सामन्यांच्या २३ डावात ४१.७७ च्या सरासरीने ९१९ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. हेडची या वर्षीची सर्वोच्च धावसंख्या १६३ आहे.
- मार्नस लाबुशेन :ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज मार्नस लाबुशेननं यावर्षी १३ सामन्यांच्या २५ डावांत ३४.९१ च्या सरासरीनं ८०३ धावा केल्या. या वर्षी त्यानं १ शतक आणि ४ अर्धशतकं ठोकली. त्याची सर्वोच्च धावसंख्या १११ आहे.
- जो रूट : इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने यावर्षी केवळ ८ सामन्यांच्या १४ डावात ६५.५८ च्या सरासरीनं ७८७ धावा केल्या. रूटनं या वर्षात २ शतकं आणि ५ अर्धशतकं साजरी केली. त्याची सर्वोत्तम धावसंख्या १५३ आहे.