हैदराबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघानं पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली असली, तरी भारतीय संघातील सर्व स्टार खेळाडू तिसर्या वनडे सामन्यात खेळणार आहेत. आता मालिकेतील शेवटचा सामना जिंकून मालिकेत 3-0 नं 'क्लीन स्वीप' करण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूनं चांगली कामगिरी केली आहे. तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी दुपारी 1.30 वाजता सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट, गुजरात येथे होणार आहे.
हे स्टार खेळाडू परतणार आहेत : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, विराट कोहली खेळताना दिसणार आहेत. या तिन्ही खेळाडूंना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकला नाही. बुमराहसुद्धा शेवटच्या सामन्यासाठी राजकोटला पोहोचला आहे. यासोबतच पहिल्या दोन वनडेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला तिसऱ्या वनडेतून विश्रांती देण्यात आली आहे. गिलसोबतच वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकुरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती मिळाली आहे.
मॅक्सवेल आणि स्टार्क परतले :भारताविरुद्धच्या सामन्यात मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलही खेळताना दिसणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही स्टार खेळाडू पहिल्या दोन सामन्यात खेळू शकले नाहीत. या दोन खेळाडूंच्या संघात आगमन झाल्यानं ऑस्ट्रेलियन संघाला नक्कीच बळ मिळेल.
हवामान कसं असेल?आज बुधवार 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये हलकं ढगाळ हवामान अपेक्षित आहे. हवामान खात्यानुसार पावसाची शक्यता केवळ 6 टक्के आहे. हलका मध्यम पाऊस पडू शकतो, सामन्यात जास्त पाऊस पडणार नाही आणि प्रेक्षक संपूर्ण सामन्याचा आनंद घेऊ शकतील. तापमानाबाबत बोलायचं झालं तर कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 25 अंश राहण्याचा अंदाज आहे.