नवी दिल्ली Team India Squad for England Test Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आलीय. ध्रुव जुरेलनं भारतीय संघात प्रवेश केलाय. तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाहेर ठेवण्यात आलंय. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. तर युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला संधी मिळालीय.
मोहम्मद शमीला संघात स्थान नाही : भारत आणि इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादेत होणार आहे. भारतानं पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केलाय. मात्र यात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघाचा भाग नाही. 2023 च्या विश्वचषकात शमीनं घातक गोलंदाजी केली होती. विशेष म्हणजे त्याला नुकतंच अर्जुन पुरस्कारानंही गौरविण्यात आलंय. तरीही तो संघाबाहेर आहे.
बुमराह-सिराजचं भारतीय संघात पुनरागमन : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचं पुनरागमन झालंय. ते अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेचा भाग नाही. दोघांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलीय. त्यांच्या ऐवजी आवेश खान आणि मुकेश कुमार संघात आपलं स्थान निर्माण करण्यात यश आलंय. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू खेळाडूही इंग्लंडविरुद्ध भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र इशान किशनला संधी देण्यात आलेली नाही.