मुंबई -आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बुधवारी रात्री बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ निवडला. यात तीन खेळाडू राखीव म्हणून निवडण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय संघात आर. अश्विनला मोठ्या गॅपनंतर संधी मिळाली आहे.
आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु त्याला इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यातील पहिल्या चार सामन्यात अंतिम संघात खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. यामुळे भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी तसेच जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण त्याची टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावरून तो किती महत्वाचा खेळाडू आहे, हे स्पष्ट होते.
आर. अश्विन याने 12 जून 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तो अखेरचा टी-20 सामना 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्याला 2017 नंतर भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. आता 4 वर्षानंतर त्याची भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे.