मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा थरार 26 मार्चपासून सुरु झाला आहे. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स वगळता आता प्रत्येक संघाने सहा सामने खेळले आहेत. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) देखील आपले सहा सामने खेळलेत. पंरतु या संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. मात्र या संघाचा प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) सध्या शानदार फॉर्मध्ये आहे. त्याने आता एका शोमध्ये बोलताना, त्याने विराट आणि त्याच्यातील एका वादावर खुलासा केला आहे.
आयपीएल 2020 मध्ये मुंबई विरुद्ध बंगळुरु ( IPL 2020 Mumbai vs Bangalore ) संघात एक सामना झाला होता. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने शानदार पारी खेळताना, मुंबई संघाला विजय मिळवून दिला. या सामन्या दरम्यान विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यात एक चकमक झाली होती, ज्यावर आता सूर्यकुमार यादवने गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या लोकप्रिय यूट्यूब शोमध्ये बोलताना त्या घटनेचा खुलासा केला आहे.
विराट कोहलीने उकसवल्यानंतर ही सूर्यकुमार यादव शांत राहिला होता, त्यावर बोलताना तो म्हणाला, मैदानावरील त्याची उर्जा नेहमीच वेगळ्या पातळीवर असते. दोन्ही संघांना विजयासाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यामुळे त्याचे स्लेजिंगही दुसऱ्या पातळीवर होते. मी स्वतःला सांगत होतो, 'मला माझा फोकस ठेवायचा आहे आणि हा सामना जिंकायचा आहे, काहीही झाले तरी. मी च्युइंगम चघळत होतो पण आतून घाबरलो होतो.