मुंबई - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलेला अष्टपैलू खेळाडू, स्टुअर्ट बिन्नीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2015 नंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि तो मागील सहा वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. स्टुअर्ट बिन्नी, भारताचे माजी दिग्गज गोलंदाज रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे. बिन्नीने भारताकडून 6 कसोटी 14 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळली.
स्टुअर्ट बिन्नीने 2014 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 4 धावा देत 6 गडी बाद केले होते. असा कारनामा एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यात स्टुअर्ट बिन्नीला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 114 चेंडूत 78 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे हा सामना ड्रॉ राहिला.
स्टुअर्ट बिन्नीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात तो म्हणतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून मला खूप चांगले वाटलं. मी बीसीसीआय आणि कर्नाटक क्रिकेट संघाचे आभार मानतो. त्यांनी मला साथ दिली. कर्नाटक संघाचे कर्णधारपद भूषवणे आणि रणजी करंडक जिंकणे हा एक खास अनुभव आणि गौरवशाली क्षण होता. क्रिकेट माझ्या रक्तात वाहतं आणि मी पुढे देखील या खेळासाठी आपले योगदान देत राहिन.