मुंबई -आयपीएल 2021 हंगामाच्या पहिल्या हाफमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात शानदार कामगिरी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसऱ्या हाफसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. बंगळुरूने आपल्या संघात नव्या तीन खेळाडूंना सामिल करून घेतलं आहे. यासोबत त्यांनी मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिचच्या जागेवर माइक हेसन यांची नियुक्ती केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा आणि वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीरा यांना संघात घेतलं आहे. त्यांनी अॅडम झम्पा आणि डॅनियल सॅम्स यांच्या जागेवर हे बदल केले आहेत. याशिवाय बंगळुरूने सिंगापूर संघातील टिम डेव्हिड याला न्यूझीलंडचा फलंदाज फिन एलनच्या जागेवर स्थान दिलं आहे.
आयपीएल 2021च्या मध्यात बंगळुरू संघात स्थान मिळालेला स्कोट कुग्लेन आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे बंगळुरू संघात खेळणार नाही. याशिवाय केन रिचर्डसन देखील सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. अशात बंगळुरू संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यांच्या जागेवर माईक हेसन यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.