पुणे:अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानने (Legspinner Rashid Khan ) टी-20 क्रिकेटमध्ये आपली चमकदार कामगिरी सातत्याने सुरू ठेवली आहे. राशिदच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम असून आता आणखी एक विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. T20 क्रिकेटमध्ये 450 बळी घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो आणि दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिर यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज आहे.
काल रात्री लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ( Lucknow Super Giants ) खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 57 व्या सामन्यात राशिदने हा कारनामा केला आहे. या सामन्यात त्याने चार विकेट घेत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. राशिद या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आपल्या नवीन फ्रँचायझीसाठी सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. या मोसमात खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांमध्ये राशिदने 21.66 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने सातपेक्षा कमी इकॉनॉमीने धावा केल्या आहेत.