नवी दिल्ली- माजी कर्णधार आणि सध्याच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख राहुल द्रविड जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध सहा सामन्यांची मर्यादित षटकांची मालिका खेळणार्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील. २०१४ मध्ये इंग्लंड दौर्यादरम्यान खेळाडूंबरोबर फलंदाजी सल्लागार म्हणून काम केल्यानंतर भारतीय संघाबरोबरचा त्याचा हा दुसरा कार्यकाळ आहे.
प्रसार माध्यमाशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की रवी शास्त्री, भरत अरुण आणि विक्रम राठौर हे तिघेही कसोटी संघाच्या दौऱ्यासाठी इंग्लंडला जाणार असल्याने एनसीएचे प्रमुख राहुल द्रवीड संघाचे प्रशिक्षक असतील.
"टीम इंडियाचे कोचिंग कर्मचारी ब्रिटनमध्ये असतील आणि यंग टीमला राहुल द्रवीडचे मार्गदर्शन मिळतंय ही चांगली गोष्ट आहे. यापूर्वी त्याने भारतीय अ संघासोबत काम केले आहे. तरुण खेळाडू त्याच्यासोबत राहतील हे जास्त फायदेशीर आहे.'', असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
२०१९ मध्ये एनसीएच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी द्रविडने अंडर -१९ व भारतीय ‘अ’ संघातील सध्याच्या तरुण खेळाडूंबरोबर काम केले होते. २०१५ मध्ये अंडर -१९ 'आणि ‘अ’ संघाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या काही वर्षांत त्याने राष्ट्रीय संघासाठी मजबूत फळी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होणे अपेक्षित आहे. तीन एकदिवसीय आणि तीन टी -२० सामने या मालिकेत खेळवण्यात येतील. स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी संघातील सर्व खेळाडूंना श्रीलंकेत काही काळ क्वारंटाइन रहावे लागणार आहे. तीन एकदिवसीय सामने १३, १६ आणि १९ जुलै रोजी खेळले जातील. टी २० सामने २२ आणि २७ जुलै रोजी खेळवण्यात येतील.
युवा भारतीय खेळाडू मर्यादित षटकांच्या मालिकेत श्रीलंकेबरोबर सामना खेळण्याचा विचार करीत असताना, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंडमध्ये ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहे. १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी झुंज देणार आहे.