मुंबई -देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील सरसावला आहे. पंतने स्वत: ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली.
पंतने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मित्रांनो, आपला देश निराशेतून जात आहे. याचं मला खूप वाईट वाटतं. मी अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना कोरोनामुळे गमावताना पाहिलं आहे. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे आपल्यात नाहीत, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. लढाई जिंकण्यासाठी सांघिक कामगिरी महत्वाची असते, हे मी क्रिकेटमधून शिकलो आहे.
कोरोनाच्या महामारीचा सामना करण्यासाठी मी हेमकुंट या सेवाभावी संस्थेला आर्थिक मदत करत आहे. ही संस्था रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन बेड्स, कोरोना कीट यासारख्या वस्तू गरजूंना पुरवेल. ग्रामीण आणि निमशहरी भागात शहरांच्या तुलनेत वैद्यकीय सेवेचा अभाव असतो. त्यामुळे खेड्यातील आणि निमशहरी लोकांना मी मदत करणार आहे, असे देखील पंतने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.