लाहोर: पाकिस्तान आणि इंग्लंड संघात सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सहावा सामना ( PAK vs ENG 6th T20I ) पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 8 विकेटसने धूळ ( Pakistan lost to England by 8 wickets ) चारली. त्याचबरोबर मालिकेत 3-3 ने बरोबरी केली. या सामन्यात सलामीवीर फिल सॉल्टने 88 धावांची ( Phil Salts half century ) आकर्षक खेळी करत बाबर आझमची 87 धावांची ( Babar Azams half century ) खेळीवर पाणी फेरले. सॉल्टने 41 चेंडूत नाबाद 88 धावा केल्याने इंग्लंडने केवळ 14.3 षटकात 2 बाद 170 धावा करून आरामात विजय मिळवला. इंग्लंडने अवघ्या 7 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या, यावरून इंग्लंडच्या फलंदाजीचा अंदाज लावता येतो.
तत्पूर्वी, बाबरच्या 59 चेंडूत नाबाद 87 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 6 बाद 169 धावा केल्या होत्या. या दोन संघांमधील सातवा आणि निर्णायक सामना आता रविवारी गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. सॉल्टने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजीचे चमकदार उदाहरण सादर केले. कारण इंग्लंडने पहिल्या सहा षटकात 1 बाद 82 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदाच इतक्या धावा दिल्या.