मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 24 एप्रिलला 49वा वाढदिवस ( Sachin Tendulkar's 49th Birthday ) आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याचा चाहतावर्ग आजही कमी झालेला नाही. आज पण सचिनचा चाहतावर्ग संपूर्ण जगात आहेत. मुंबईतला सचिनप्रेमी असलेल्या सनी काजळे या तरुणाने गेल्या सतरा वर्षात सचिनची 4 हजार छायाचित्रे आणि त्याच्यावर वर्तमानपत्रात आलेल्या विविध बातम्यांचे संकलन केलेले आहे. हे संकलन स्वरूपी पुस्तक सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याला प्रत्यक्ष भेटून देण्याची इच्छा सनीने ईटीव्ही भारत समोर व्यक्त केली आहे.
वडिलांमुळे सनी झाला सचिनचा फॅन -सनीला क्रिकेट पाहण्याची आवड लहानपणापासून आहे. त्याचे वडील सुरेश काळजे हे सचिनचे मोठे चाहते होते. ते रोज डायरी लिहायचे त्यांच्यातून सनीला सचिन तेंडुलकरच्या छायाचित्रांचे आणि त्यांच्यावरील विविध वर्तमानपत्रात, आलेल्या बातम्यांचे संकलन करण्याची कल्पना सुचली. त्याने 2005 पासून आजतागायत हा छंद आवडीने जोपासला आहे. त्यांच्याकडे सहा पुस्तके होतील एवढे संकलन आहे. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उल्हासनगर येथील शारदा विद्यानिकेतन मध्ये झाले आहे. तर पदवी एसएसटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पूर्ण केली आहे. तो सध्या अकाउंट म्हणून एका कंपनीत काम करतो. तो कामाच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून सचिनविषयी कुठे काही साहित्य प्रकाशित झाले आहे का? याची माहिती घेत काम करण्याचे निमूटपणे संकलन करतो. त्याच्या या आगळ्या वेगळ्या छंदाला कुटुंबातील सदस्यांचा देखील पाठींबा आहे.