साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. आज या सामन्याचा पाचवा दिवस असून पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व मिळवलं आहे. न्यूझीलंडची अवस्था २ बाद १०१ धावांवरून उपाहारापर्यंत ५ बाद १३५ धावा अशी झाली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडचा फलंदाज बीजे वॉटलिंगचा त्रिफाळा उडवला. या क्षणाचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे.
पाचव्या दिवशी देखील सामन्याला पावसामुळे उशिरा सुरूवात झाली. तेव्हा रॉस टेलर आणि केन विल्यमसन ही जोडी सावध खेळ करत होती. शमीने टेलरला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. वैयक्तिक ११ धावांवर टेलरचा झेल हवेत सूर मारत शुबमनने टिपला. त्यानंतर हॅन्री निकोलसला इशांतने रोहितकडे झेल देण्यास भाग पाडलं. दुसरीकडून शमीने बीजे वॉटलिंगच्या दांड्या गुल करत न्यूझीलंडला जबर हादरा दिला. शमीने फेकलेला चेंडू वॉटलिंगला काही कळाच्या आत यष्ट्यावर जाऊन आदळला. दरम्यान, वॉटलिंगचा हा अखेरचा सामना आहे. या सामन्यानंतर तो निवृत्त होणार आहे.
बुमराह चूकीची जर्सी घालून मैदानात उतरला...