मुंबई : मुंबई इंडियन्सने रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव करत पहिली महिला प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकली. मुंबईने प्रथम दिल्लीला 9 बाद 131 धावांवर रोखले आणि नंतर तीन चेंडू शिल्लक असताना विजयी लक्ष्य पूर्ण केले. मुंबईकडून नॅट सायव्हर - ब्रंटने 55 चेंडूंत नाबाद 60 धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 39 चेंडूंत 37 धावा केल्या. या दोघींच्या बळावर मुंबईने 19.3 षटकांत 3 बाद 134 धावा करत पहिली महिला प्रीमियर लीग आपल्या नावे केली.
हेली मॅथ्यूजची शानदार गोलंदाजी : तत्पूर्वी, ब्रेबॉर्न स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग (29 चेंडूत 35 धावा) हिने सर्वाधिक धावा केल्या. तर शेफाली वर्मा (11) आणि मारिझान कॅप (18) या दोघींनी दुहेरी धावसंख्या गाठल्या. एका क्षणाला दिल्लीची परिस्थिती 16 षटकांत 9 बाद 79 अशी बिकट झाली होती. मात्र त्यानंतर शिखा पांडे (नाबाद 27) आणि राधा यादव (नाबाद 27) यांनी अवघ्या 24 चेंडूत 52 धावा जोडून दिल्लीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. मुंबईकडून हेली मॅथ्यूज (4-2-5-3) हिने घातक गोलंदाजी करत दिल्लीचे कंबरडे मोडले. तर इस्सी वोंग (3/42) आणि मेली केर (2/18) ह्यांनी देखील तिची उत्तम साथ दिली.