मुंबई: आयपीएल 2022 च्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( RCB vs KKR ) संघात पार पडला. हा सामना मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. अखेरच्या षटकांपर्यंत गेलेल्या रोमांचक सामन्यात दिनेश कार्तिकने विजयी चौकार लगावला, ज्यामुळे कोलकातावर बंगळुरुने 3 विकेट्सने विजय ( RCB won by 3 wkts ) मिळवला. विजयानंतर बोलताना विजयी संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला, शेवटच्या षटकांत दिनेश कार्तिकचा अनुभव कामी आला.
कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला, हा विजय चांगला होता. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना सकारात्मक विचारांसोबत उतरायला हवे, परंतु इतक्या शेवटपर्यंत सामना जाईला नको होता. केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. तो पुढे म्हणाला, या खेळपट्टीवर खुप सीम आणि उछाल होती. दोन तीन दिवसांपुर्वी या खेळपट्टीवर 200 विरुद्ध 200 धावसंख्या उभारली गेली होती. परंतु आज या खेळपट्टीवर 120 विरुद्ध 120. आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकायला हवे होते. मात्र विजय हा विजयच असतो. त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांने दिनेश कार्तिकचे कौतुक देखील केले. तो म्हणाला, शेवटी डीकेचा अनुभव कामी आला. तो शेवटच्या पाच षटकांत इतका शांत होता, जसा महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) असतो.