नवी दिल्ली :टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. पाठीच्या दुखापतीशी झुंजत असलेला बुमराह आता झपाट्याने बरा होतो आहे. बुमराहच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केला आहे. त्यामुळे आता बुमराह लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा अंदाज बांधला जातो आहे. पुनरागमनासाठी त्याला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाची वाट पाहावी लागणार नाही. तो लवकरच मैदानावर खेळताना दिसणार आहे. ही टीम इंडियाचे खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे.
सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटपासून दूर : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. बुमराहने दुखापतीपूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियासाठी शेवटची मालिका खेळली होती. तेव्हापासून बुमराह दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2023 ला देखील मुकावे लागले आहे. पण आता बुमराह पुन्हा मैदानात परतू शकतो. ऑक्टोबर - नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराह संघात सामील होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. बुमराहचे चाहते देखील सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याचा पुनरागमनाचा आनंद व्यक्त करत आहेत.