नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव करत यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात केली आहे. विराट कोहली बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तो 49 चेंडूत 82 धावा काढून नाबाद राहिला. कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही 43 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या शानदार भागिदारीच्या बळावर आरसीबीने मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान 17 व्या षटकातच पूर्ण केले.
तिलक वर्माने मुंबईला सावरले : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात डळमळीत झाली. 20 धावांवर मुंबईने आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. परंतु मुंबई इंडियन्सचा डावखुरा फलंदाज तिलक वर्माने प्रथम आपल्या संघाचा डाव सांभाळला आणि नंतर शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या 171 पर्यंत पोहोचवली. त्याने 46 चेंडूत नाबाद 84 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार ठोकले. बंगळुरूसाठी कर्ण शर्माने 4 षटकात 32 धावा देत 2 बळी घेतले.
आरसीबीची फलंदाजी मजबूत : 2009 च्या फायनलमध्ये आरसीबीला डेक्कन चार्जर्स हैदराबाद कडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने त्यांचा पराभव केला होता. तर 2016 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत होऊन आरसीबी दुसऱ्या स्थानी राहिली होती. आरसीबीच्या फलंदाजीत खूप विविधता आहे. त्यांच्याकडे विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिससारखे धडाकेबाज फलंदाज आहेत. तर मुंबईच्या संघातही कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशनसारखे दर्जेदार भारतीय फलंदाज आहेत.