नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये आत्तापर्यंत अनेक विक्रम बनले आहेत. पण असेही काही विक्रम आहेत जे काही गोलंदाजांसाठी लक्षात ठेवण्यासारखे नाहीत. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज पियूष चावलाने हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान असाच एक विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम त्याला स्वत:ला कधीच लक्षात ठेवायला आवडणार नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजांची यादी पियूष चावलाच्या नावे हा नकोसा रेकॉर्ड : हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना पियूष चावलाने 4 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध 4 चौकार आणि 2 षटकार खेचले. अशाप्रकारे आत तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणाऱ्या गोलंदाजांच्या लिस्टमध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये चावलाविरुद्ध आत्तापर्यंत 185 षटकार मारण्यात आले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज : फिरकी गोलंदाज पियुष चावला व्यतिरिक्त इतर खेळाडूंचे रेकॉर्ड बघितले तर या यादीत सर्व फिरकी गोलंदाजांचीच नावे आहेत. फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलविरुद्ध 182 षटकार ठोकण्यात आले आहेत. चहलशिवाय रवींद्र जडेजाविरुद्धही 180 षटकार ठोकले आहेत. तर अमित मिश्राच्या चेंडूवर फलंदाजांनी 176 षटकार ठोकले आहेत. रविचंद्रन अश्विननेही आयपीएलमध्ये 173 षटकार खाल्ले आहेत. अशाप्रकारे पाहिल्यास पियूष चावलाने आयपीएलमध्ये एक असा विक्रम केला आहे, जो त्याला स्वत: लक्षात ठेवायला आवडणार नाही.
पियूष चावलाची कारकीर्द : पियूष चावला भारतीय संघाकडूनही बराच काळ खेळला आहे. तो 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त तो चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे. सध्या तो मुंबई इंडियन्सकडून खेळत असून त्यांच्यासाठी तो चांगली गोलंदाजी करतो आहे. मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यात त्याने 7 बळी घेतले आहेत.
हेही वाचा :IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची पहिल्या विकेटनंतर प्रतिक्रिया, म्हणाला..