मोहाली :इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा मुकाबला गतविजेत्या गुजरात टायटन्सशी मोहालीत होणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ गेल्या सामन्यात रिंकू सिंगने मारलेल्या 5 षटकारांच्या वेदना विसरून नवी सुरुवात करू इच्छितो. दुसरीकडे, गुजरात टायटन्सचा संघ देखील पंजाब किंग्जला राहुल तेवतियाच्या दोन षटकारांची आठवण करून देऊ शकतो. राहुल तेवतियाने पंजाबविरुद्ध शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
शेवटच्या षटकात 19 धावांची आवश्यकता: 8 एप्रिल 2022 रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने 189 धावा केल्या आणि गुजरात टायटन्सला 190 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या 59 चेंडूत 96 धावा आणि साई सुदर्शनच्या 30 चेंडूत 35 धावांच्या बळावर गुजरात टायटन्सने 19 षटकात 171 धावा केल्या. त्यावेळी डेव्हिड मिलर आणि कर्णधार हार्दिक पांड्या हे क्रीजवर होते. लास्ट ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 19 धावा हव्या होत्या. हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर ही आक्रमक फलंदाजांची जोडी गुजरातला हा सामना सहज जिंकून देतील असे वाटत होते. मात्र अखेरच्या षटकात भरपूर रोमांच पाहायला मिळाला.