गुवाहाटी :आयपीएलच्या 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव केला आहे. राजस्थानने दिलेल्या 200 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव गडगडला. 20 षटकांत दिल्लीच्या संघाने 9 विकेट गमावून 142 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकाकी झुंज दिली. त्याने 55 चेंडूत 65 धावा केल्या. दिल्लीचे इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने घातक गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
दिल्लीचा डाव गडगडला :सलामीवीर पृथ्वी शॉ या सामन्यातही अपयशी ठरला आहे. त्याला शून्याच्या स्कोरवर ट्रेंट बोल्टने आउट केले. संघात पुनरागमन करणारा अनुभवी फलंदाज मनिष पांडेही काही कमाल दाखवू शकला नाही. त्याला पहिल्याच चेंडूवर बोल्टने एलबीडब्लू आउट केले. दिल्लीकडून ललित यादवने थोडाफार संघर्ष केला. त्याने 24 चेंडूत 38 धावा केल्या. त्यालाही बोल्टनेच आउट केले.
राजस्थानची दमदार बॅटिंग : प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दमदार सुरुवात केली. राजस्थानच्या 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा झाल्या आहेत. सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक 79 धावा केल्या. त्याला जयस्वाल आणि हेटमायरने उत्तम साथ दिली. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 तर कुलदीप यादव व रोवमन पॉवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.