चेन्नई : येथील चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघादरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. चेन्नई संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात गुजरात संघाचा 15 धावांनी धुव्वा उडवून तब्बल 10 व्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई संघाने 172 धावा केल्या. मात्र प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 157 धावांवर गुंडाळण्यात चेन्नई संघाला यश आले. दुसरीकडे सामना हरला, तरी गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
चेन्नई संघाला अंतिम फेरीत खेळण्याचे तिकीट :चेन्नई सुपर किग्ज संघाने गुजरात टायटन्सचा पराभव करत या मोसमातील अंतिम फेरीत खेळण्याचे तिकीट मिळवले आहे. चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकीय खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारायला मदत केली. ऋतुराज गायकवाडने 60 धावांची खेळी केली. त्याला डेव्हॉन कॉनवेने 40 धावांचे योगदान देत चांगली मदत केली. या दोन्ही समामीविरांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांचा पाया रचला. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने 16 चेंडूत 22 धावा करुन विस्फोटक खेळी केली. चेन्नई संघाचे आघाडीचे फलंदाज अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूला आज सारख्याच 17 धावा करता आल्या. दुसरीकडे मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह शिवम दुबेने भोपळा फोडून प्रत्येीक एक धाव केली. मोईन अली 4 चेंडूत 9 धावा करुन नाबाद तंबुत परतला. गुजरात संघाकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गड्यांना तंबुचा रस्ता दाखवला. तर दर्शन नळकांडे, नूर अहमद आणि राशिद खानला चेन्नईचा एकेक मोहरा टिपण्यात यश आले. चेन्नईच्या संघाने 172 धावा करत गुजरात संघाला 173 धावांचे लक्ष्य दिले.