अबुधाबी -कोलकाता नाइट रायडर्सने सात गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकात्यासमोर विजयासाठी 156 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान केकेआरने केवळ तीन गडी गमावत 16 व्या षटकात पूर्ण केले. राहुल त्रिपाठी (74 धावा) आणि व्यंकटेश अय्यर (53 धावा) यांच्या तुफानी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. कोलकाताचे तिन्ही गडी जसप्रीत बुमराहने बाद केले. व्यंकटेश अय्यर याने आपल्या आयपीएलमधल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक ठोकलं आहे.
केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी आश्वासक सुरूवात केली. जम बसल्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. पॉवर प्लेमध्ये या जोडीने बिनबाद 56 धावा धावफलकावर लावल्या. सुनिल नरेनने ही धोकादायक होत असलेली जोडी फोडली. त्याने 10व्या षटकात रोहित शर्माला शुबमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. रोहित शर्माने 30 चेंडूत 4 चौकारासह 33 धावांचे योगदान दिले.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. परंतु त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. कृष्णाने 13व्या षटकात सूर्यकुमार यादवला (5) दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने सेट फलंदाज क्विटन डी कॉकला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. डी कॉकने 42 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारासह 55 धावांची खेळी साकारली. यानंतर आलेल्या इशान किशनने 13 चेंडूत 1 षटकारासह 14 धावा केल्या. त्याची विकेट लॉकी फर्ग्यूसन याने घेतली.