नवी दिल्ली:आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला (Fifteenth season of IPL) लवकरच सुरुवात होणार आहे. या अगोदर पंधराव्या हंगामाचा मेगा लिलाव होणार आहे. त्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरवात होणार आहे. यंदा हा हंगाम 8 संघात न होता 10 संघात होणार आहे. या वर्षीच्या हंगामापासून अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन संघ आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यापैकी संजीव गोयंका यांच्या लखनऊ संघाने (Sanjeev Goenka owner of Lucknow team)आपल्या संघाचे नाव जाहीर केले आहे.
यंदा आयपीएल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लखनऊ संघाने आपल्या संघाचे नाव आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले आहे. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत आपल्या संघाचे नाव ‘लखनऊ सुपरजायंट्स’ (Lucknow Supergiants)असे ठेवले असल्याचा खुलासा केला आहे. हे नाव संजीव गोयंका यांच्या पहिल्या पुणे रायझिंग सुपरजायंटस संघाच्या नावाप्रमाणे आहे.
या अगोदर लखनऊ सुपरजायंट्स संघाने 22 जानेवारी रोजी आपल्या संघासाठी तीन खेळाडू ड्राफ्टमधून निवडले आहेत. ज्यामध्ये कर्णधार केएल राहुल (Captain KL Rahul), ऑस्ट्रलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस आणि रवि बिष्णोई यांचा समावेश आहे. या तिघांना अनुक्रमे 15, 11 आणि 4 कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात आले आहे.