पुणे:पुणे : मंगळवारी (26 एप्रिल) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 39 वा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या दोन संघातील हा सामना यंदाच्या हंगामातील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने आरआरला पराभूत केले होते. या परभवाचा बदला घेण्यासाठी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान सज्ज असणार आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) सात सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे दहा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने( Royal Challengers Bangalore Team ) आठ सामने खेळले असून पाच विजय आणि तीन पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे या संघाच्या खात्यात दहा गुण आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. राजस्थानने आपल्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे, तर बंगळुरु संघाने मागील सामन्यात हैदराबाद संघाकडून परभव स्वीकारला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, या संघातील खेळाडूंनी दोन्ही विभागात शानदार प्रदर्शन केले आहे. जोस बटलरची ( Jose Butler ) बॅट सध्या आग ओकत आहे. त्याने आतापर्यंत पंधराव्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या तीन शतकांता समावेश आहे. त्याचबरोबर युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal ) फिरकीसमोर विरोधी संघातील फलंदाज हतबल दिसत आहेत. मात्र आरसीबी संघाचे चित्र वेगळे आहे, कारण फाफ डु प्लेसिस आणि दिनेश कार्तिक वगळता कोणी सातत्याने धावा करत नाही. गोलंदाजीमध्ये देखील हर्षल पटेल शिवाय कोणाला छाप पाडता आलेली नाही.