मुंबई - आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामाचे वेळापत्रक अद्याप येणे बाकी आहे. अशात आयपीएल २०२२ ची चर्चा सद्या जोरात सुरू आहे. कारण बीसीसीआय आयपीएल २०२२ मध्ये दोन नविन संघ सहभागी करून घेणार आहे. तसेच या हंगामासाठी मेगा ऑक्शन प्रक्रिया डिसेंबरमध्ये होणार आहे.
आयपीएल २०२२ ऑक्शनआधी बीसीसीआय सर्व संघांना फक्त चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देऊ शकतो. नियमानुसार, या चारमध्ये तीन भारतीय तर एक विदेशी खेळाडूला रिटेन करता येईल किंवा दोन भारतीय आणि दोन विदेशी खेळाडूंच्या रिटेनचा पर्याय आहे. रिटेन केलेल्या खेळाडूंची बोली लागणार नाही.
आता सर्वात जास्त चर्चा रंगली आहे की, प्रत्येक संघ कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार. यात महेंद्रसिंह धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जविषयी तर जास्तच चर्चा आहे. या संघात रिटेन करायचे म्हटल्यास, सर्वात आधी नाव येते महेंद्रसिंह धोनीचे. चेन्नई धोनीला सोडू इच्छित नाही. याचे संकेत चेन्नई व्यवस्थापनाने आधीच दिले आहेत. दुसरा खेळाडू सुरेश रैना किंवा रविंद्र जडेजा ठरू शकतो. तसे तर दोन्ही खेळाडू चेन्नईसाठी महत्वपूर्ण आहेत. पण या दोघांना रिटेन करण्याची शक्यता थोडी कमी आहे. जर धोनीला रिलिज करण्यात आले तर या दोघांना रिटेन करण्याचा विचार चेन्नईकडून होऊ शकतो.