मुंबई:सोमवारी (8 मे) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 56 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा मोठ्या फरकाने पराभव करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. केकेआरने मुंबई इंडियन्सचा 52 धावांनी पराभव केला आणि गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मोठा खुलासा केला आहे.
नवी मुंबईतील डी. व्हाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 165/9 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ 17.3 षटकांत 113 धावा करून सर्वबाद झाला.
सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने ( KKR captain Shreyas Iyer ) या विजयावर आनंद व्यक्त करत संघाची कामगिरी इतर सामन्यांमध्येही अशीच सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, दमदार पुनरागमन करून सामना मोठ्या फरकाने जिंकला. पॉवरप्लेमध्ये आमची सुरुवात चांगली झाली आणि व्यंकटेश अय्यरने गोलंदाजांना चांगला चोप दिला. नितीश राणाने पोलार्डच्या चेंडूंवर ज्या पद्धतीने षटकार मारले, ते बघण्यासारखे होते. पण नवीन फलंदाजाला खेळपट्टीवर येताच धावा काढणे अवघड आहे असे मला वाटले.