मुंबई:इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये रविवारी 62 वा सामना वानखेडे स्टेडियवरवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स ( Chennai Super Kings and Gujarat Titans ) आमने सामने आले होते. ज्यामध्ये गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जवर सात विकेट्सने ( Gujarat Titans won by 7 wickets ) मात केली. गुजरातचा हा हंगमातील 10 वा विजय असून या संघाने दुसऱ्यांदा चेन्नई संघाला धूळ चारली आहे.
या सामन्यात सीएसके संघाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित 20 षटकात 5 बाद 133 धावा केल्या होत्या. ज्यामुळे गुजरात संघाला 134 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य गुजरातने 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. गुजरातकडून वृद्धिमान साहाने ( Wridhiman Saha ) सर्वाधिक नाबाद 67 धावा केल्या, त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही आणि तिसऱ्याच षटकातच संघाने सलामीवीर डेव्हॉन कॉनवेची (5) विकेट गमावली. येथून, ऋतुराज गायकवाडने प्रथम मोईन अली (17 चेंडूत 21 धावा, दोन षटकार) सोबत 57 धावा आणि नंतर एन जगदीसन सोबत 48 धावांची भागीदारी केली. दरम्यान, गायकवाडनेही 44व्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, संघाच्या धावांचा वेग वाढवण्यात त्यांना यश आले नाही.
राशीद खानने 16व्या षटकात प्रथम रुतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) आणि नंतर 17व्या षटकात शिवम दुबेला बाद करत सीएसकेला दुहेरी धक्का दिला. गायकवाडने बाद होण्यापूर्वी 49 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. शेवटच्या काही षटकांमध्येही सीएसकेचा धावांचा वेग फारसा वेगवान नव्हता आणि गुजरातने शेवटच्या काही षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात धोनीला (7) शमीनेही बाद केले. सीएसकेने शेवटच्या 5 षटकात फक्त 24 धावा दिल्या आणि या दरम्यान त्यांनी एकही चौकार मारला नाही. शेवटी, एन जगदीसन नाबाद राहिला आणि त्याने 33 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या. मिचेल सँटनरन1 धावेवर नाबाद राहिला. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमीने 2, अल्झारी जोसेफ, साई किशोर आणि रशीद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
134 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सला वृध्दिमान साहा आणि शुभमन गिल (17 चेंडूत 18 धावा, 3 चौकार) यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. त्यानंतर साहाने मॅथ्यू वेडसोबत 31धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. सीएसकेने वेड (15 चेंडूत 20, दोन चौकार) आणि हार्दिक पंड्या 10 धावांच्या आत घेतले, परंतु पुनरागमन करण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला. साहाने (57 चेंडूंत 8 चौकार व एक षटकार, नाबाद 67 धावा) शानदार अर्धशतक झळकावले आणि शेवटी डेव्हिड मिलर (20 चेंडूंत 15 धावा, एक चौकार) याच्यासोबत 37 धावांची भागीदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने दोन आणि मोईन अलीने एक विकेट घेतली.
हेही वाचा -Ipl 2022 Rr Vs Lsg : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; राजस्थानमध्ये दोन तर लखनौ संघात एक बदल