मुंबई - भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने के एल राहुलकडून आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात सर्वश्रेष्ठ कामगिरीची आपेक्षा व्यक्त केली आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार के एल राहुलने आयपीएल 2021 पहिल्या सत्रातील 7 सामन्यात 66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दरम्यान, कोरोनामुळे आयपीएल 2021 चा हंगाम मे महिन्यात स्थगित करण्यात आला होता. आता या उर्वरित हंगामाला यूएईमध्ये रविवारपासून सुरूवात होणार आहे.
गौतम गंभीर स्टार स्पोर्टसच्या गेम प्लॅनमध्ये म्हणाला की, आपण अजून के एल राहुलची सर्वश्रेष्ठ कामगिरी पाहिलेली नाही. त्याने धावा केल्या पण आपण हे नाही पाहिलं की, तो फलंदाजीत काय करू शकतो. तो विराट कोहली पेक्षा देखील चांगला खेळू शकतो. चांगल्या स्ट्राईट रेटने तो दोन किंवा तीन शतक करू शकतो.
केएल राहुलने आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात 7 सामने खेळली. यात त्याने चार अर्धशतकासह 311 धावा केल्या. तो आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसाठी परिस्थिती अनुकूल -
दुसऱ्या संघाविषयी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, यूएईतील परिस्थिती गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघासाठी अनुकूल आहे. चेपॉक असो किंवा दिल्ली येथील परिस्थिती पाहता ती वानखेडे पेक्षा वेगळी आहे. मला वाटत की, यूएईतील परिस्थिती मुंबईचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट अनुकूल असेल. त्यांना स्विंग मिळेल आणि ते धोकादायक ठरतील.