दुबई -दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर सनरायझर्स हैदराबाद संघाला 134 धावांपर्यंत मजल मारता आली आणि दिल्लीला विजयासाठी 135 धावांचे आव्हान मिळाले. हैदराबादकडून अब्दुल समद याने सर्वाधिक 28 धावांचे योगदान दिले. तर राशिद खान 22 धावांवर धावबाद झाला. डेविड वॉर्नर, केन विल्यमसनसह वरच्या फळीतील फलंदाजांनी साफ निराशा केली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 3 तर एनरिक नॉर्खिया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डेविड वॉर्नर आणि रिद्धीमान साहा ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी आली. पण एनरिच नार्खिया याने पहिल्याच षटकात डेविड वॉर्नरला भोपळाही फोडू दिला नाही. त्याने त्याला शून्यावर अक्षर पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर रिद्धीमान साहाच्या (18) रुपाने हैदराबादला दुसरा धक्का बसला. कगिसो रबाडा याने त्याला शिखर धवन करवी झेलबाद केले.
मनिष पांडे आणि केन विल्यमसन या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अक्षर पटेलला मोठा फटका मारण्याच्या मोहात उडालेला केन विल्यमसनचा झेल हेटमायर याने टिपला. विशेष म्हणजे केन विल्यमसनला या झेलआधी दोन जीवदान मिळाले होते. तरी देखील तो या जीवदानाचा फायदा घेऊ शकला नाही. त्याने 18 धावा केल्या. विल्यमसन पाठोपाठ मनिष पांडे देखील माघारी परतला. पांडेला कगिसो रबाडाने स्लोवर वन चेंडूने चकवलं. बॅटची कट घेऊन उडालेला झेल खुद्द रबाडा यानेच घेतला. त्याने 17 धावांची खेळी केली.