चेन्नई - आयपीएल २०२१ मधील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सनरायजर्स हैदराबादचा ६ धावांनी पराभव केला. पण या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुमकडे परतताना विराटने आपला राग खुर्चीवर काढला. या प्रकणात आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल विराटला फटकारण्यात आले आहे.
नेमके काय आहे प्रकरण -
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात बुधवारी सामना रंगला होता. या सामन्यात विराट २९ चेंडूत अवघ्या ३३ धावा केल्यानंतर बाद झाला. त्यामुळे संतापलेल्या विराटने पॅव्हेलियनकडे परतताना बंगळुरूच्या डगआऊटमध्ये असलेली खुर्ची बॅटने उडवली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील क्रिकेटपटूही त्याच्याकडे पाहत राहिले.
विराटच्या या कृत्याची दखल मॅच रेफरींनी घेतली. त्यांनी विराटला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. विराटला आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ गुन्हा २.२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या नियमांतर्गत क्रिकेट उपकरणांशिवाय मैदानातील साहित्याचं नुकसान करणं अशा बाबींचा समावेश होतो.