दुबई -श्रेयस अय्यरने दुखापतीतून सावरल्यानंतर आयपीएलमध्ये थाटात पुनरागमन केले. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आकर्षक फटकेबाजी करत चाहत्याची मने जिंकली. या सामन्यातील कामगिरीसह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. तो टी-20 क्रिकेटमध्ये चार हजारी मनसबदार बनला आहे.
श्रेयस अय्यरने टी-20 क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पार केला. यात आंतरराष्ट्रीय आणि सर्व टी-20 सामन्यातील धावांचा समावेश आहे. 150 टी-20 सामन्यात त्याने ही किमया साधली. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने 25 धावा पूर्ण करताच त्याने चार हजार धावांचा टप्पा गाठला.
हैदराबादविरुद्धच्या यासामन्याआधी त्याचे नावे 3 हजार 975 धावांची नोंद होती. यात 2 शतके आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 147 इतकी आहे. आयपीएलमधील श्रेयसची सर्वोच्च धावसंख्या 96 इतकी आहे. त्याला अद्याप आयपीएलमध्ये शतक झळकावता आलेले नाही. पण त्याचा आयपीएलमधील स्ट्राइक रेट 126 इतका आहे.