नवी दिल्ली -राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादचा ५५ धावांनी पराभव करत विजयी लय मिळवली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादपुढे विजयासाठी २२१ धावांचे मोठं आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल हैदराबादचा संघाला २० षटकात ८ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादचा या स्पर्धेतील हा सहावा पराभव आहे.
राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मनीष पांडे आणि जॉनी बेयरस्टो या जोडीने ६.१ षटकात ५७ धावांची सलामी दिली. मुस्तफिजूरने पांडेला (३१) क्लीन बोल्ड करत ही जोडी फोडली. त्यानंतर बेयरस्टोचा अडथळा राहुल तेवतियाने दूर केला. त्याने बेयरस्टोला रावतकडे झेल देण्यास भाग पाडलं. यानंतर ठराविक अंतराने हैदराबादचे गडी बाद होत गेले. विजय शंकर (८), केन विल्यमसन (२०), केदार जाधव (१९), मोहम्मद नबी (१७) आणि अब्दुल समद (१०) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. परिणामी हैदराबादच्या संघाला २० षटकात ८ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थानकडून मुस्तफिजूर आणि मॉरिस यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर त्यागी आणि तेवतिया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून हैदराबादने राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. राशिद खानने त्याच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला (१२) पायचीत करत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. सॅमसन व बटलर जोडीने दुसऱ्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी केली.