दुबई -चांगल्या सुरूवातीनंतर मधली फळी कोसळल्याने राजस्थान रॉयल संघाला 149 धावांपर्यंत मजल मारता आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईसने 8.2 षटकात 77 धावांची सलामी दिली. एकवेळ राजस्थानचा संघ 11 षटकात 1 बाद 100 अशा सुस्थितीत होता. तेव्हा बंगळुरूची फिरकी जोडी चहल आणि शाहबाज अहमदने राजस्थानच्या डावाला खिंडार पाडले. अखेरीस राजस्थानला 20 षटकात 9 बाद 149 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर चहल, अहमदने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. बंगळुरूला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राजस्थानची एविन लुईस आणि यशस्वी जैस्वाल सलामीवीर जोडी मैदानात आली. या जोडीने बंगळुरूच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी 8.2 षटकात 77 धावांची सलामी दिली. डॅन ख्रिश्चियनने यशस्वीला बाद करत ही जोडी फोडली. यशस्वीने 22 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावांची खेळी केली.
यशस्वीचा झेल मोहम्मद सिराजने घेतला. यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. दुसरीकडून लुईसने फटकेबाजी केली. त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर जॉर्ज गार्टन याने त्याला बाद केले. लुईसने 37 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावांची खेळी साकारली. त्याचा झेल श्रीकर भरतने घेतला. एविन लुईस पाठोपाठ महिपाल लोमरोर (3) माघारी परतला. त्याची विकेट युझवेंद्र चहलने घेतली.