मुंबई - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा हा निर्णय यशस्वी ठरला नाही. चेन्नईने डू प्लेसिसच्या ९५ व ऋतुराज गायकवाडच्या ६४ धावांच्या बळावर २० षटकात ३ बाद २२० धावा केल्या. कोलकातासमोर विजयासाठी २२१ धावांचा डोंगर पार करण्याचे आवाहन ठेवले होते.
कोलकाताचा डाव -
चेन्नईच्या मोठ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. पहिल्या 5 फलंदाजांना दुहेरी आकडाही गठता आला नाही. यामध्ये शुभर गील शुन्यावरच बाद झाला. त्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनी चेन्नईच्या गोलंदांची चांगलीच धुलाई केली. दिनेश कार्तिकने 40 धावा तर रसेलने 54 धावांची खेळी केली. त्यानंतर पॅट कमिन्सनने आक्रमक खेळी करत कोलकाताला 202 धावांवर नेऊन ठेवले. कमिन्सने 66 धावांची नाबाद खेळी केली.
चेन्नईचा डाव -
कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईकडून मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी डावाची सुरुवात केली. मागील तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडनं आज चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 5 षटकात या दोघांनी चेन्नईच्या 44 धावा फलकावर लावल्या. ऋतुराज व डू प्लेसिसने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५४ धावा चोपून काढताना केकेआरच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ऋतुराज गायकवाडने 11व्या षटकात आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनं ३३ चेंडूंत अर्धशतक झळकावताना डू प्लेसिससह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची दमदार भागीदारी केली. ऋतुराजने ४२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावा केल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले. ऋतुराज बाद झाल्यानंतर डू प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात चेन्नईने दीडशे धावांचा पल्ला ओलांडला.