चेन्नई - मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आणि शुबमन गिल-नितीश राणा या जोडीने ८.५ षटकात ७२ धावांची ताबडतोड सलामी दिली असताना देखील कोलकाता नाईट रायडर्स सामना गमावेल असे कुणालाही वाटले नव्हते. पण मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत दमदार पुनरागमन करताना १० धावांनी सामना जिंकला. कोलकाताच्या या कामगिरीवर संघ मालक व बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नाराजी व्यक्त केली. त्याने आपल्या संघाच्या वतीने चाहत्यांची माफी मागितली आहे.
आपल्या संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. मी संघाच्या वतीने सर्व केकेआर चाहत्यांची माफी मागतो, अशा आशयाचे ट्विट करुन शाहरुखने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही चाहत्यांनी आपला संघ नक्की जिंकेल, असे म्हणत शाहरुखला प्रोत्साहन दिले आहे.
चेन्नईच्या मैदानात धावांचा पाठलाग करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला रोखत मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सूर्यकुमार यादव ५६ आणि रोहित शर्मा ४३ यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली. नितीश राणा ५७ आणि शुबमन गिल ३३ यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. राहुल चाहरने सेट झालेल्या या दोघांसह राहुल त्रिपाठी ५, इयॉन मॉर्गन ७ धावांवर माघारी धाडले. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली. डावाच्या शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना बोल्टने रसेल आणि कमिन्स यांना बाद केलं आणि मुंबईने यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.
हेही वाचा -IPL २०२१ : 'सामना गमावला तरी मनं जिंकलीस, असाच खेळत राहा', आजी-माजी क्रिकेटपटूंकडून सॅमसनचे कौतुक
हेही वाचा -MI Vs KKR : मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर १० धावांनी विजय