दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रातील सामने पाहण्याासाठी प्रेक्षकांनी मैदानावर येण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने आनंद व्यक्त केला. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षक संख्या मैदानाच्या एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के असेल. तसेच प्रेक्षकांना कोरोना प्रोटोकॉल आणि यूएई सरकारच्या निर्देशाचे कटेकोर पालन करावे लागणार आहे.
केकेआरचा कर्णधार इयॉन मार्गन म्हणाला की, आयपीएलमध्ये प्रेक्षक पुन्हा पाहायला मिळणार आहेत. यामुळे आम्ही खूप उत्साहित आहोत. ईडन गार्डन मध्ये केकेआरच्या प्रेक्षकांचा आवाज ऐकू आला नाही. दुर्दैवाने यंदा ही स्पर्धा यूएईत होत आहे. तरी देखील यूएईत प्रेक्षकांचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही वाट पाहू शकत नाही.
कोलकाता नाइट रायडर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी प्रेक्षकांच्या समर्थनामुळे संघाला प्ले ऑफमध्ये जाण्यास मदत मिळेल, असे म्हटलं आहे. मॅक्युलम म्हणाले की, ही खूप चांगली बातमी आहे. आम्ही प्रेक्षकांची मैदानावर कधी वापसी होईल याविषयी चर्चा करत होतो. आता आम्हाला कळलं की, प्रेक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व स्टेडियम केकेआरच्या चाहत्यांनी भरून जाईल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही त्यांच्या समर्थनाचा वापर करू. हे आमच्यासाठी खूप मोठा टास्क आहे.