मुंबई - आयपीएल २०२१ वर कोरोनाचे काळे सावट पसरले आहे. मागील काही दिवसात आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजे याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. हा दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजे आयपीएल खेळण्यासाठी भारतात दाखल झाला होता. तो बीसीसीआयच्या कोविड-१९ च्या प्रोटोकॉलनुसार काही दिवस क्वारंटाईन होता. यादरम्यान, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे.
एएनआय वृत्तसंस्थेला दिल्ली कॅपिटल्स संघातील सूत्राने सांगितलं की, 'नॉर्टजे आफ्रिकेतून भारतात दाखल झाल्यानंतर क्वारंटाईन होता. त्याचे सुरूवातीचे काही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण दुर्दैवाने एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे.'
बीसीसीआयच्या कोविड-१९ च्या प्रोटोकॉलनुसार, जर एखादा खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ कोविड पॉझिटिव्ह आढळला तर त्याला निगेटिव्ह येईपर्यंत कमीत कमी १० दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. हा प्रोटोकॉल पाहता नॉर्टजे पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. हा दिल्ली संघासाठी मोठा धक्का आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नॉर्टजेच्या संबंधी अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. याआधी अक्षर पटेल देखील कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे. भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत भारतात आयपीएल २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा -केकेआरवरील विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, प्रामाणिकपणे मी...
हेही वाचा -विमानामध्ये एकट्याला भीती वाटते; पाकिस्तानच्या गोलंदाजाचा झिब्बाब्वे दौऱ्याला जाण्यास नकार