मुंबई - आयपीएल २०२१ मधील १२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित २० षटकात ९ बाद १८८ धावा करत राजस्थानसमोर विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर, चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे.
चेन्नईचा डाव -
चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू व सुरेश रैना यांनी चांगली कामगिरी करत सीएसकेसाठी मजबूत पायाभरणी केली. मात्र राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत चेन्नईच्या धावांवर अंकूश लावला. महेंद्रसिंग धोनी आज चांगल्या लयीत दिसत असताना पुन्हा एकदा खराब फटका मारून बाद झाला. धोनी व रवींद्र जडेजा यांच्याकडे ६ षटके खेळण्यासाठी असतानाही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दोघांनी २१ चेंडूंत केवळ २२ धावांची भागीदारी केली.राजस्थानकडून चेतन सकारियाने तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत चेन्नईला बॅकफूटवर ढकलले.
सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा निराशा केली. केवळ १० धावांवर तो माघारी परतला. डू प्लेसिसने जयदेव उनाडकटच्या पाचव्या षटकात तीन चौकार व एक षटकार खेचत १९ धावा केल्या. ख्रिस मॉरिसने डू प्लेसिसला ३३ धावांवर बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर मोईन अलीने काही आक्रमक फटके मारले. पण राहुल तेवतियाच्या फिरकीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. अलीनं २० चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २६ धावा केल्या.
३ बाद ७८ अशा अवस्थेत असताना चेन्नईचे सर्वात अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू व सुरेश रैना खेळपट्टीवर होते. रायुडूचा परतलेला फॉर्म चेन्नईसाठी सुखावणारा ठरला. त्यानं १७ चेंडूंत ३ षटकारांसह २७ धावा करत चौथ्या विकेटसाठी रैनासह २६ चेंडूंत ४५ धावा जोडल्या. चेतन सकारीयाने त्याची विकेट घेतली. त्याच षटकात संजू सॅमसन याने रैनाला धावबाद करण्याची सोपी संधी गमावली. पण, चेतननं सुरेख गोलंदाजी करताना सुरेश रैनाला १८ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले.
चेन्नईनं १४ षटकांत ५ बाद १२५ धावा केल्या होत्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा ही जोडी खेळपट्टीवर असल्याने चेन्नईला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण धोनी आजही चाचपडताना दिसला. धोनी व जडेजा जोडीने १७ चेंडूनंतर पहिला चौकार मारला. धोनीने १७ चेंडूंत १८ धावा केल्या.
राजस्थानकडून चेतनने ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. जडेजा ६ चेंडूंत ८ धावा करून ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शेवटच्या षटकात सॅम करन धावबाद झाला. ड्वेन ब्राव्होने नाबाद ८ चेंडूत नाबाद २० धावांचे योगदान दिल्याने चेन्नईला २० षटकांत ९ बाद १८८ धावा करता आल्या.