दुबई - राजस्थान रॉयल्स संघाने मंगळवारी झालेल्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्सवर अवघ्या 2 धावांनी विजय मिळवला. पण या विजयात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनकडून मोठी चूक झाली आहे. त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
संजू सॅमसनच्या संघाने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात षटकाची गती संथ राखली. यामुळे संजू सॅमसनवर दंडाची कारवाई करण्यात आली. त्याने आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केला. यामुळे संजूला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल के एल राहुल आणि मयांक अगरवाल यांनी पंजाब किंग्स संघाला 120 धावांची सलामी दिली. या दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाच्या क्षेत्ररक्षकांनी गचाळ क्षेत्ररक्षण केले. त्यांनी के एल राहुलचे तीन सोपे झेल सोडले.
अखेरीस चेतन साकारियाच्या गोलंदाजीवर कार्तिक त्यागीने झेल घेत राहुलची खेळी संपुष्टात आणली. यानंतर एडन मार्करम, मयांक जोडीने चांगली फलंदाजी केली. मयांक बाद झाल्यानंतर पूरन-मार्करम जोडी पंजाबला सहज विजय मिळवून देणार असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी सामन्याला कलाटणी मिळाली.
पंजाब किंग्सला अखेरच्या षटकात विजयासाठी 4 धावांची गरज होती. तेव्हा संजू सॅमसनने गोलंदाजीसाठी युवा गोलंदाज कार्तिक त्यागीवर विश्वास दाखवला. त्याने या षटकात अवघी एक धाव देत तसेच दोन गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. त्यागीने अखेरच्या षटकात निकोलस पूरन आणि दीपक हुड्डाला बाद केले आणि रोमांचक सामना राजस्थानने आपल्या नावे केला.
हेही वाचा -IPL 2021 : सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजाला कोरोनाची लागण; IPL वर अनिश्चिततचे सावट
हेही वाचा -IPL 2021: पंजाब किंग्सला अशा पराभवाची सवय झालीय, अनिल कुंबळे संतापले