मुंबई - दिल्ली कॅपिटल्स संघाच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु, श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदा ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे श्रेयसचे पुनरागमन झाल्यावर कोण दिल्लीचे नेतृत्व करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कर्णधारपदाचा निर्णय माझ्या हातात नसल्याचे श्रेयसने सांगितलं.
आयपीएल स्पर्धेआधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएल २०२१ हंगामाला मुकावे लागले होते. हा हंगाम देशातील वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण यामुळे स्थगित करण्यात आला होता. आता उर्वरित हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत होणार आहे. या उर्वरित हंगामात खेळण्यासाठी श्रेयस सज्ज झाला आहे.
श्रेयस म्हणाला, खांद्याला झालेल्या दुखापतीतून मी सावरलो आहे. आता अखेरचा टप्पा बाकी असून त्याला महिन्याभराचा कालावधी लागेल. परंतु, मी सरावाला सुरुवात केली आहे. मी आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामात खेळणार आहे.