दुबई -कोरोनामुळे इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चा तेरावा हंगाम यूएईमध्ये खेळवला जात आहे. काही खेळाडूंनी व्यक्तिगत कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली. तर, काही खेळाडू उशिरा संघात सामील झाले आहेत. राजस्थान रॉयल्सचा बेन स्टोक्स हे नावही असेच आहे. आयपीएल सुरू झाल्यानंतर काही सामन्यानंतर तो राजस्थानच्या संघात दाखल झाला. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सबाबत राजस्थानच्या फ्रेंचायझीकडून एक चूक झाली. यामुळे फ्रेंचायझीला ट्रोल करण्यात आले.
राजस्थान रॉयल्सने केले बेन स्टोक्सचे बारसे? - बेन स्टोक्स जर्सी न्यूज
'जंटलमन्स गेम्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये काहीवेळा गमतीशीर गोष्टी घडतात. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या बेन स्टोक्स सोबत अशीच एक घटना घडली आहे.
फ्रेंचायझीने स्टोक्सच्या जर्सीवर स्टोक्स (Stokes) च्या जागी स्कोक्स (Skokes) असे लिहिले होते. जर्सीवरील नावाच्या प्रिंटींगमध्ये ही चूक झाली होती. इंग्लंडच्या बार्मी आर्मी या क्रिकेट फॅन क्लबने ही चूक पकडली. त्यांनी आपल्या इस्टाग्रामवर स्टोक्सचा या जर्सीसह फोटोही अपलोड केला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा भरवशाचा खेळाडू म्हणून असलेल्या बेन स्टोक्सला ६ सामने खेळता आले नाही. तो न्यूझीलंडमध्ये कर्करोगाने आजारी असलेल्या आपल्या वडिलांजवळ होता. नंतर वडिलांच्या सांगण्यावरून स्टोक्स आयपीएलमध्ये सहभागी झाला. हैदराबादविरुद्ध खेळलेल्या आपल्या पहिल्या सामन्यात स्टोक्सला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने ६ चेंडूत केवळ ५ धावा केल्या.