अबुधाबी -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात १०० बळी घेणारा जसप्रीत बुमराह हा १६वा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी अबुधाबी येथील शेख झायेद मैदानावर झालेल्या सामन्यात बुमराहने विराट कोहलीचा बळी घेतला आणि बुमराहने आयपीएलमध्ये १०० बळी घेण्याचा नवा विक्रम स्थापित केला. योगायोगाने बुमराहने आयपीएलमध्ये पहिली विकेटसुद्धा विराट कोहलीचीच घेतली होती. सध्या सोशल मीडियावर बुमराह आणि कोहलीच्या या योगायोगाची चर्चा सुरू आहे.
आयपीएलमधील बुमराह आणि कोहलीमधील अद्भुत योगायोग
सध्या सोशल मीडियावर बुमराह आणि कोहलीमधील या योगायोगाची चर्चा सुरू आहे.
२०१३च्या आयपीएलच्या हंगामात बुमराहने पदार्पण केले होते. यावेळी बुमराहने विराट कोहलीला माघारी धाडत आपल्या पहिल्या आयपीएल बळीची नोंद केली. आयपीएलमध्ये १०० बळींचा विक्रम आपल्या नावे करणारा बुमराह तिसरा युवा क्रिकेटपटू ठरला आहे. हा विक्रम बुमराहने २६ वर्ष आणि ३७२ दिवस असे वय असताना केला आहे. त्यापूर्वी फिरकीपटू पीयूष चावलाने २६ वर्ष आणि ११७ दिवस असे वय असताना हा विक्रम नोंदवला होता. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी नोंदवणारा बुमराह सहावा भारतीय आणि एकूण ४१वा गोलंदाज ठरला आहे, तर अशी कामगिरी करणार तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
आज अबुधाबीविरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहने ४ षटकांत अवघ्या १४ धावा देत ३ फलंदाजांना तंबूत पाठवले.