अबुधाबी -मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी मात करत दणदणीत विजय मिळवला. गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानच्या खेळाडूंनी नांगी टाकली. मुंबई इंडियन्सने विजयाची हॅटट्रिक साजरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सपुढे सुसाट फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सचे खडतर आव्हान होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला १९४ धावांचे आव्हान दिले. मागील दोन सामन्यातील पराभवातून धडा घेत राजस्थान विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. सलामीवीर रोहित शर्माची दमदार सलामी आणि मधल्या फळीत सूर्यकुमार यादवच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने राजस्थानसमोर २० षटकात ४ बाद १९३ धावा केल्या. नाणेफेक जिंकून मुंबईने अबुधाबीत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या सलामीवीरांनी ४९ धावांची सलामी दिली. राजस्थानकडून पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या कार्तिक त्यागीने क्विंटन डी कॉकला (२३) माघारी धाडले. तर, रोहित ३ षटकार आणि २ चौकारांसह ३५ धावांवर बाद झाला. या दोघांनंतर सूर्यकुमारने मुंबईच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या बाजूने इशान किशन (०) आणि कृणाल पांड्या (१२) अपयशी ठरले. सूर्यकुमारने हार्दिक पांड्याला हाताशी धरत संघाची धावगती वाढवली. सूर्यकुमारने ११ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या. तर, हार्दिकने नाबाद ३० धावा केल्या. राजस्थानकडून श्रेयस गोपालला २ तर, जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागीला प्रत्येकी एक बळी मिळाला.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाची सुरूवात निराशजनक होती. सलामीवीर यशस्वी जैस्वाल शून्य धावावर बाद झाला. मात्र जोस बटलरने शानदार खेळी करत संघाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. बटलरने ४४ चेंडूत ५ षटकार ठोकत ७० धावा केल्या. त्यानंतर राजस्थानचा कोणताही खेळाडू 25 धावाही काढू शकला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ४ षटकात ४ बळी घेत केवळ २० धावा दिल्या. तर जेम्स पॅटिन्सन आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ बळी टिपले. मुंबईच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राजस्थानचा संघ १३६ धावांतच गारद झाला. सूर्यकुमार यादवला सामनावीर घोषीत करण्यात आले.
LIVE UPDATE :
- १३६ धावांत राजस्थान संघ गारद.
- राजस्थानचा आठवा गडी बाद, तेवतिया माघारी.
- राजस्थानला ३० चेंडूत ८१ धावांची गरज.
- राजस्थानला ६० चेंडूत १३१ धावांची गरज.
- दहा षटकानंतर राजस्थानच्या ४ बाद ६३ धावा.
- टॉम करन मैदानात.
- महिपाल राहुल चहरच्या गोलंदाजीवर बाद.
- पाच षटकानंतर राजस्थानच्या ३ बाद २३ धावा.
- महिपाल लोमरोर मैदानात.
- तीन षटकानंतर राजस्थानच्या ३ बाद १२ धावा.
- राजस्थान संकटात, सॅमसनही माघारी. बोल्टचा दुसरा बळी.
- संजू सॅमसन मैदानात.
- राजस्थानला दुसरा धक्का, स्मिथ ६ धावांवर बाद, बुमराहने केले बाद.
- पहिल्या षटकात राजस्थानच्या १ बाद ५ धावा.
- स्मिथकडून डावाचा पहिला चौकार.
- स्मिथ मैदानात.
- यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद.
- ट्रेंट बोल्ट टाकतोय मुंबईसाठी पहिले षटक.
- राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर मैदानात.
- २० षटकात मुंबईच्या ४ बाद १९३ धावा.
- सूर्यकुमार ७९ तर हार्दिक ३० धावांवर नाबाद.
- अठराव्या षटकात टॉम करनने सोडला हार्दिक पांड्याचा झेल.
- १७.३ षटकात मुंबईच्या १५० धावा.
- सूर्यकुमारचे अर्धशतक, खेळीत ८ चौकार.
- पंधरा षटकानंतर मुंबईच्या ४ बाद १२५ धावा.
- १४ षटकानंतर मुंबईच्या ४ बाद ११७ धावा.
- हार्दिक पांड्या मैदानात.
- जोेफ्रा आर्चरने कृणाल पांड्याला १२ धावांवर केले बाद.
- दहा षटकानंतर मुंबईच्या ३ बाद ९० धावा.
- कृणाल पांड्या मैदानात.
- किशन शून्यावर बाद. गोपालला दुसरी विकेट.
- इशान किशन मैदानात.
- रोहितच्या खेळीत ३ षटकार आणि २ चौकारांचा समावेश.
- श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना रोहित झेलबाद.
- मुंबईला दुसरा धक्का, रोहित शर्मा ३५ धावांवर बाद.
- आठ षटकानंतर रोहित ३५ तर, सूर्यकुमार १२ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर मुंबईच्या १ बाद ५० धावा.
- सूर्यकुमार यादव मैदानात.
- नवख्या कार्तिक त्यागीने डी कॉकला केले बाद.
- मुंबईला पहिला धक्का, डी कॉक २३ धावांवर माघारी.
- रोहितकडून सामन्याचा पहिला षटकार.
- मुंबईच्या पहिल्या षटकात बिनबाद १० धावा.
- पहिल्याच चेंडूवर डी कॉकचा चौकार.
- अंकित राजपूत टाकतोय राजस्थानसाठी पहिले षटक.
- मुंबईचे सलामीवीर रोहित आणि डी कॉक मैदानात.
- मुंबईची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.